खामगाव : श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या गर्दीचा फायदा घेत भाविकाच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरीला गेल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी जयपूर लांडे पुलाजवळ घडली. तब्बल २५ ग्रॅम वजनाची जुनी सोन्याची चैन चोरीला गेल्याने पालखी सोहळ्यातील गर्दीत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या चैनची आजची किंमत सुमारे ४ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. मौदा, जि. नागपूर येथील संदीप गणपतराव मरघडे (५२) हे मित्रांसह श्री गजानन महाराज पालखीसोबत खामगावहून शेगावकडे पायी जात होते. पालखी जयपूर लांडे पुलाजवळ पोहोचली असता त्यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी एका महिलेने इशारा करून एका व्यक्तीने चैन चोरल्याचे सांगितले. त्यानंतर मरघडे व त्यांच्या मित्रांनी संशयित सुधीर रावसाहेब कराळे (२१, रा. धामगाव देवीचे, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) याला पकडून पायी खामगाव शहर पोलीस ठाण्यात आणले. मरघडे यांच्या तोंडी तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी सुधीर कराळे याच्याविरुद्ध कलम ३०३ (२) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ. भीमराव वानखेडे करीत आहेत.