Headlines

मलकापूर बसस्थानकासमोरील स्ट्रीट लाईट सहा महिन्यांपासून बंद; अपघातांसह सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मलकापूर : शहरातील मलकापूर बसस्थानकासमोरील बुलढाणा रोडवरील स्ट्रीट लाईट गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्य रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने अपघाताची भीती व्यक्त होत असून, चोरीच्या घटनांनाही अंधाराचा फायदा मिळण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
बुलढाणा रोड हा शहरातील प्रमुख मार्ग असून या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र, रस्त्यावरील इलेक्ट्रिक पोलवरील स्ट्रीट लाईट बंद असल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना अंधारातून मार्ग काढावा लागत आहे.
सुमारे सहा महिन्यांपूर्वी बुलढाणा रोडवरील डिव्हायडरचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतरपासून या मार्गावरील स्ट्रीट लाईट बंद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काम पूर्ण होऊनही प्रकाश व्यवस्था पूर्ववत न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
मलकापूर शहरात चोरीच्या घटनांचे प्रमाण लक्षात घेता, रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत चोरट्यांकडून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अंधारामुळे वाहनचालकांना रस्त्यावरील अडथळे आणि इतर वाहने स्पष्टपणे दिसत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो.
प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन बुलढाणा रोडवरील बंद असलेल्या स्ट्रीट लाईट त्वरित सुरू कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मुख्य रस्त्यावरील प्रकाश व्यवस्था सुरळीत झाल्यास नागरिकांची सुरक्षितता वाढण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!