मलकापूर : धोनखेड (ता. मोताळा) येथील ६५ वर्षीय इसमाचा विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना १८ ऑगस्ट रोजी मलकापूर येथे घडली. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धोनखेड येथील कमलाकर कडु सोनोने (वय ६५) यांनी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना उपचारासाठी १८ ऑगस्ट रोजी मलकापूर येथील निरामय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. याबाबत डॉक्टरांच्या वतीने कक्षसेवक सागर किसन होनाळे (रा. वडनेर भोलजी) यांनी मलकापूर शहर पोलिसांना मेमो दिला. या मेमोवरून पोलिसांनी मर्ग क्र. ००/२०२६, कलम १९४ बीएनएसएस अन्वये नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.