बुलढाणा : शहरात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
बुलढाणा शहर पोलिसांनी २६ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ६:३० वाजताच्या सुमारास येळगाव परिसरात ही कारवाई केली. या वेळी आरोपी आनंद काशिराम वाघ (वय ३८) याला ताब्यात घेण्यात आले. पोलीस हेड कॉन्स्टेबल रविंद्र हजारे यांनी पंचासमक्ष प्रोव्ही रेड केली असता आरोपीच्या ताब्यातील १५ लिटर क्षमतेच्या कॅनमध्ये सुमारे १० लिटर हातभट्टी दारू आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत अंदाजे १००० रुपये असून, प्लास्टिक कॅनसह एकूण ११०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी वरिष्ठांच्या आदेशान्वये पुढील तपास सुरू असून पोहेका रविंद्र हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सूत्रे वेगाने फिरत आहेत.