मलकापूर : राष्ट्रीय महामार्गावरून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध एमआयडीसी मलकापूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. दसरखेड परिसरात पोलिसांना पाहताच ट्रॅक्टर चालकाने वाळू रस्त्यावर खाली टाकून घटनास्थळावरून पलायन केले. या कारवाईत पोलिसांनी ट्रॅक्टरसह तब्बल ८ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १.३० वाजताच्या दरम्यान दसरखेडजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर विना क्रमांकाचे ट्रॅक्टर वाळूची वाहतूक करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र चालकाने ट्रॅक्टर न थांबवता त्यातील सुमारे एक ब्रास वाळू रस्त्यावर खाली टाकली. त्यानंतर ट्रॅक्टर जागीच सोडून चालकाने पळ काढला. या प्रकरणाच्या चौकशीत अजय पाटील (रा. सालबर्डी, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) व स्वप्नील कैलास जुमळे (२६, रा. अहिल्यादेवी नगर, मुक्ताईनगर, जि. जळगाव) यांची नावे निष्पन्न झाली. दोघांविरुद्ध एमआयडीसी मलकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.