मलकापूर : एसटी बसमधून प्रवास करताना महिलांच्या गर्दीचा फायदा घेत एका महिला प्रवाशाच्या बॅगेतील तब्बल ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना ३ ऑगस्ट रोजी नांदुरा ते मलकापूरदरम्यान घडली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत चोरीच्या संशयावरून पाच ते सहा महिलांना ताब्यात घेतले आहे.
खामगाव तालुक्यातील पळशी बु. येथील अर्चना मधुकर उगले (वय ४४) या ३ ऑगस्ट रोजी शेगाववरून शिर्डीकडे जाणाऱ्या एसटी बस क्रमांक एमएच १४-एलएक्स ४४५६ मधून प्रवास करीत होत्या. दरम्यान, नांदुरा येथून दोन महिला बसमध्ये चढल्या. नांदुरा ते मलकापूरदरम्यान गर्दीचा फायदा घेत या महिलांनी उगले यांच्या बॅगेतून सोन्याचे दागिने व रोख रक्कम काढल्याचा संशय आहे.
मलकापूर शहराजवळील लक्ष्मीनगर पुलाखाली त्या दोन्ही महिला बसमधून उतरल्या. त्यानंतर बसमधील एका महिला प्रवाशाने उगले यांना त्यांच्या बॅगेतील चोरीबाबत माहिती दिली. बॅग तपासली असता दागिने व पैसे गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ बस वाहकाला याची माहिती दिल्यानंतर बस मलकापूर शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आली.
पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून संशयित महिलांचा शोध घेतला. मलकापूरहून नरवेलकडे जाणाऱ्या एसटी बस क्रमांक एमएच ४०-एन ९९४९ मधून संशयित पाच ते सहा महिलांना ताब्यात घेण्यात आले. संबंधित बसही पोलिस ठाण्यात आणण्यात आली.
उगले यांच्या तक्रारीनुसार, दोन ग्रॅम सोन्याची पॉलीस असलेली पट्टी पोत अंदाजे २० हजार रुपये आणि चार ग्रॅम वजनाचे कानातील झुमके अंदाजे ४० हजार रुपये, असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध अप. नं. ५६२/२०२६ अन्वये कलम ३०३(२) बीएनएसएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.