मलकापूर :- बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरी, दरोड्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून नागरिक हैराण झाले आहेत. रोजच कुठे ना कुठे चोरी उघडकीस येत आहे. नांदुरा तालुक्यातील काटी येथे दरोड्यात एका व्यक्तीचा खून आणि माकनेर येथे महिलेवर हल्ला, खामगाव-बुट्टी येथे चोरट्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या घटना घडल्या आहेत. मलकापूरमध्ये चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. वाढलेल्या शेतातील पिकाचा आधार घेत चोरटे पळून जात असल्याने ग्रामीण भागात टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.
*मलकापूर तालुक्यात धक्कादायक घटना – आरोपींना अटक*
दरम्यान, मलकापूर तालुक्यातील एका गावात उदरनिर्वाहासाठी आलेल्या एका महिलेवर दोन इसमांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमुळे ग्रामीण भागात दहशत निर्माण झाली होती. *या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.*
अफवा, फेरीवाल्यांना मारहाण या प्रकारांमुळे संभ्रम वाढला असून, याबाबत पोलिसांनी गावोगावी जनजागृती शिबिरे घेऊन मार्गदर्शन करावे व रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
*”आपलं गाव आपली जबाबदारी” – अनेक गावात रात्रभर पहारा*
या पार्श्वभूमीवर *नांदुरा तालुक्यातील – हिंगणे गव्हाळ, चांदूर बिस्वा, विटाळी धानोरा, मामुलवाडी, वडनेर, काटी* आणि *मलकापूर तालुक्यातील – घिर्णी, बेलाड, उमाळी, माखनेर, बाहापुरा, पान्हेरा* अशा अनेक गावांमध्ये “आपलं गाव आपली जबाबदारी” या संकल्पनेतून तरुणांनी व ग्रामस्थांनी हातात काठ्या, टॉर्च घेऊन रात्रभर गावाची सुरक्षा सुरू केली आहे.