Headlines

विदर्भ लाईव्हच्या बातमीचा दणका! मलकापूर आगारात पाससाठी रांगेत उभ्या विद्यार्थ्यांसाठी तात्पुरती सावली

मलकापूर : एसटी बस पास मिळविण्यासाठी रणरणत्या उन्हात तासनतास रांगेत उभे राहणाऱ्या विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिकांच्या गैरसोयीबाबत ‘विदर्भ लाईव्ह’ने आवाज उठविल्यानंतर मलकापूर आगार प्रशासनाला अखेर जाग आली आहे. पास वितरण केंद्राबाहेर विद्यार्थ्यांना उन्हापासून दिलासा मिळावा, यासाठी आगार प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपात सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हात उभे राहून पास मिळविण्यासाठी प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मलकापूर आगारातील पास वितरण केंद्राबाहेर विद्यार्थ्यांसह वयोवृद्ध नागरिकांना उन्हात उभे राहावे लागत असल्याचे चित्र समोर आले होते. शिक्षणासाठी एसटीचा पास घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत असल्याने पालक आणि नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत होती. पास वितरणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता सावली, पिण्याचे पाणी आणि बसण्याची व्यवस्था करणे आवश्यक असतानाही या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या संदर्भात ‘विदर्भ लाईव्ह’ने वृत्त प्रकाशित करून मलकापूर आगार प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. विद्यार्थ्यांना उन्हात उभे राहावे लागण्याची परिस्थिती मांडत आगार प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली होती. या वृत्ताची दखल घेत पास वितरण केंद्राबाहेर तात्पुरत्या स्वरूपात सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, तात्पुरती सावली उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला, तरी पास वितरण केंद्रावरील गैरसोय पूर्णपणे दूर करण्यासाठी कायमस्वरूपी आणि पुरेशा सुविधांची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेऊन पास वितरणाचे योग्य नियोजन, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. विदर्भ लाईव्ह’च्या वृत्तानंतर प्रशासनाने केलेल्या या उपाययोजनेमुळे विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला असून, आता उर्वरित सुविधांकडेही आगार प्रशासन लक्ष देणार का, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!