वळणावर भीषण अपघात; बुलेटस्वार युवकाचा मृत्यू, दोघे जखमी

चिखली : लग्नासाठी जात असलेल्या तिघा युवकांच्या बुलेटला वळणावर अपघात होऊन एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ३० एप्रिल रोजी अंचरवाडी ते अंढेरा फाटा दरम्यान घडली. या अपघातात दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ओम संजय जामदार (वय २८), जय सुनील जामदार (वय २२) आणि अभिजीत प्रमोद भवर (वय २५, सर्व रा. आदर्श शाळेजवळ, चिखली) हे तिघेही बुलेटवरून लग्नसमारंभासाठी जात होते. अंचरवाडी ते अंढेरा फाट्यादरम्यान असलेल्या धोकादायक वळणावर त्यांच्या दुचाकीचा ताबा सुटल्याने अपघात झाला. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर तात्काळ स्थानिकांच्या मदतीने जखमींना चिखली येथील जवंजाळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान ओम संजय जामदार यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर जय जामदार आणि अभिजीत भवर यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
मृतक ओम जामदार हे चिखली अर्बन बँकेचे अधिकारी संजय जामदार यांचे सुपुत्र असल्याने शहरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. ओमचा मृतदेह पाहताच आई-वडील, बहिण आणि नातेवाईकांनी हंबरडा फोडत आक्रोश व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!