भरधाव ट्रकची थ्रेशरला भीषण धडक; २ ठार, ४ जखमी; तालसवाडा जवळची घटना

मलकापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर तालसवाडा नजीक पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव ट्रकने पाठीमागून थ्रेशर ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे धरणगाव येथील मजूर थ्रेशरसह ट्रॅक्टर (क्र. एमएच २८ एझेड ३२५९) घेऊन मुक्ताईनगरकडे जात होते. दरम्यान, ३० एप्रिल रोजी पहाटे सुमारे ४ वाजताच्या सुमारास तालसवाडा येथील पवार पंपाजवळ मागून येणाऱ्या भरधाव ट्रक (क्र. आरजे २९ जीबी ५६७६) चालकाने नियंत्रण गमावून ट्रॅक्टर-थ्रेशरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बाळकृष्ण त्र्यंबळ पाचपोळ (वय ३०) व रोहन किसन पाटील (वय २५) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर मंगेश विकास पाटील (वय ३५), आकाश रामचंद्र सोनटक्के (वय ३२), राजेंद्र नेरकर (वय ५०) व थ्रेशर मालक पराग लितु घ्यार (वय ४३) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलवले. या घटनेमुळे काही काळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती.
याप्रकरणी प्रदीप नंदकिशोर पाचपोळ (वय ३५) यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध भा. न्या. सं. कलम १०६(१), २८१, १२५, ३२४ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!