चिखली : शहरात रात्रीच्या वेळी गस्त घालत असलेल्या चिखली पोलिसांच्या डी. बी. पथकाने एका सराईत गुन्हेगाराला देशी बनावटीच्या पिस्तुलासह रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे. संभाजी नगर परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त केले असून, आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२३ ऑगस्टच्या रात्री चिखली पोलीस रात्रकालीन पेट्रोलिंग करीत असताना रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार ईश्वर धनवटे हा घातक आग्नेयास्त्र बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे डी. बी. पथकाने संभाजी नगर येथील गोपाळ किराणा दुकानासमोर सापळा रचून रात्री सुमारे १२.५० वाजता पायी जाणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव ईश्वर प्रकाश धनवटे (वय २५, रा. गोरक्षणवाडी, चिखली) असे सांगितले. पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेच्या उजव्या बाजूला देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. काळ्या रंगाची प्लास्टिक ग्रीप व दोन्ही बाजूंना स्टारचे चिन्ह असलेले हे पिस्तूल मॅगझिनसह जप्त करण्यात आले. त्याची अंदाजे किंमत ४५ हजार रुपये आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर शामराव शिंदे यांच्या लेखी रिपोर्टवरून ईश्वर धनवटे याच्याविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात कलम ३, २५ भारतीय शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल गवई करीत आहेत.