खामगाव : उपचारासाठी सामान्य रुग्णालयात आणलेल्या ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चरण धोंडू बाभुळकर (वय ६५, रा. जनुना ता. खामगाव) यांना १३ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास मृत अवस्थेत सामान्य रुग्णालय, खामगाव येथे दाखल करण्यात आले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कपील धोटे यांनी कक्षसेवक छगन महादेव भोयर यांच्या मार्फत याबाबतची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.