Headlines

कायद्याच्या रक्षकाकडूनच विश्वासघात; लग्नाचे स्वप्न दाखवून तरुणीवर अत्याचार; एसआरपीएफ जवानाविरुद्ध गुन्हा दाखल; खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी

लोणार : समाजात महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असते, त्याच वर्दीतील व्यक्तीकडून एका तरुणीचा विश्वासघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमाच्या नावाखाली जवळीक साधून लग्नाचे आमिष दाखवत एका २२ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा आरोप राज्य राखीव पोलिस दलातील (SRPF) जवानावर करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे “कायद्याचे रक्षकच भक्षक होत आहेत का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

याप्रकरणी नितेश राम चव्हाण (रा. तांबोळा, ता. लोणार, जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध छत्रपती संभाजीनगर येथील सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी ही जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील रहिवासी असून, पोलिस भरतीची तयारी करण्यासाठी ती २०२३ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास होती. त्यावेळी तिची आरोपीशी ओळख झाली. हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. आरोपीने लग्नाचे आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केला. तक्रारीनुसार, १८ ऑक्टोबर २०२४ ते २२ डिसेंबर २०२५ या कालावधीत आरोपीने विविध ठिकाणी नेऊन तरुणीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. विवेकानंदनगर परिसरात राहत असलेल्या पीडितेला आरोपी रूम, लॉज तसेच तिच्या राहत्या खोलीवर नेत होता. संबंधांच्या काळात त्याने काही खासगी फोटोही काढून ठेवले होते.
दरम्यान, आरोपीची एसआरपीमध्ये नागपूर येथे निवड झाल्यानंतर त्याच्या वागण्यात बदल झाला. लग्नास नकार देत त्याने तरुणीला खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मानसिक धक्का बसलेल्या तरुणीने अखेर ११ मे २०२६ रोजी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी जवानाविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, वर्दीतील व्यक्तींनीच कायद्याचा गैरवापर केल्यास सर्वसामान्यांनी न्यायासाठी कोणाकडे पाहायचे, असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!