खाकीचा धाक अन् ‘होमगार्ड’चा आव; मलकापूरातील आनंद मेळाव्यात नागरिकांची उघड दिशाभूल? खाजगी महिलांनी पोलिसांसारखी खाकी साडी घालून मिरवला रुबाब; “होमगार्ड” नावाचा वापर करून नागरिकांशी हुज्जत
खाकीचा धाक अन् ‘होमगार्ड’चा आव; मलकापूरातील आनंद मेळाव्यात नागरिकांची उघड दिशाभूल? खाजगी महिलांनी पोलिसांसारखी खाकी साडी घालून मिरवला रुबाब; “होमगार्ड” नावाचा वापर करून नागरिकांशी हुज्जत
मलकापूर ( दिपक इटणारे ) : शहरातील एका आनंद मेळाव्यात सुरू असलेला धक्कादायक प्रकार आता चर्चेचा आणि संतापाचा विषय ठरत आहे. मेळाव्यात सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्यात आलेल्या काही खाजगी महिलांनी थेट पोलिस महिलांसारखी खाकी साडी परिधान करून त्यावर मोठ्या अक्षरात “होमगार्ड” असे लिहिल्याचे समोर आले आहे. शासनाच्या अधिकृत होमगार्ड दलाशी कोणताही संबंध नसताना अशा प्रकारे “होमगार्ड” नावाचा वापर होत असल्याने नागरिकांची उघड दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप पुढे येत आहे.
मेळाव्यात येणारे अनेक नागरिक संबंधित महिलांना प्रत्यक्ष सरकारी होमगार्ड किंवा पोलीस विभागाशी संबंधित कर्मचारी समजत असल्याचे चित्र आहे. खाकी साडी, पोलिसांप्रमाणे वावरण्याची पद्धत आणि त्यावर “होमगार्ड” असे लिहिल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होत आहे. विशेष म्हणजे काही महिलांकडून नागरिकांशी उद्धट भाषा वापरून वाद घातले जात असल्याच्याही तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे “खाकीचा धाक दाखवून अधिकार गाजवण्याचा प्रयत्न सुरू आहे का?” असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. शहरात सध्या या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू असून खाजगी सुरक्षा रक्षकांना सरकारी सुरक्षा यंत्रणेशी साधर्म्य असलेला पोशाख वापरण्याची परवानगी कोणी दिली, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. जर संबंधित महिला खाजगी सुरक्षारक्षक असतील, तर त्यांनी स्वतःच्या संस्थेचा वेगळा गणवेश वापरणे अपेक्षित असताना “होमगार्ड” हा शब्द नेमका कोणाच्या परवानगीने वापरला जात आहे? यामागे प्रशासनाची मान्यता आहे का? की थेट सरकारी यंत्रणेचा आव आणून नागरिकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे सरकारी दलाचे नाव, चिन्ह किंवा त्यासारखा पोशाख वापरल्याने नागरिकांची दिशाभूल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कायद्याच्या दृष्टीनेही अशा प्रकारांकडे गंभीरतेने पाहिले जाते. त्यामुळे या प्रकरणात स्थानिक पोलीस प्रशासन व संबंधित विभागाने तात्काळ चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मेळाव्यातील काही महिलांनी “आम्ही होमगार्ड आहोत” अशा थाटात वागून नागरिकांना दमदाटी करण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. “सरकारी खाकीचा वापर करून जर खाजगी व्यक्ती अधिकार गाजवू लागल्या, तर उद्या कुणीही स्वतःला पोलीस किंवा होमगार्ड म्हणू लागेल का?” असा संतप्त सवालही नागरिकांतून उपस्थित होत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून आनंद मेळावा चालकांवर तसेच दिशाभूल करणारा पोशाख वापरणाऱ्या महिलांवर योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे. तसेच खाकी साडी व “होमगार्ड” नावाचा वापर तात्काळ बंद करून संबंधित महिलांना त्या ठिकाणाहून हटवावे, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.