मलकापूर : सातत्यपूर्ण गुणवत्तेची परंपरा जपत विद्या विकास ज्युनिअर कॉलेज, मलकापूरने यंदाच्या एच.एस.सी. परीक्षेत पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विज्ञान शाखेत ९९.३४ टक्के तर कला शाखेत शंभर टक्के निकाल लागल्याने संपूर्ण परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.
फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या एच.एस.सी. परीक्षेत विज्ञान शाखेतील एकूण ३०७ विद्यार्थ्यांपैकी ३०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून केवळ २ विद्यार्थी अनुत्तीर्ण राहिले. या शाखेत १२१ विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले असून १६७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १७ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे तृतीय श्रेणीत एकही विद्यार्थी नाही. कला शाखेनेही उत्कृष्ट कामगिरी करत १०० टक्के निकाल नोंदवला आहे. एकूण ८२ पैकी सर्व ८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये १ प्राविण्य, ४३ प्रथम श्रेणी, ३४ द्वितीय श्रेणी आणि ४ तृतीय श्रेणीचा समावेश आहे. प्राविण्य श्रेणीत अव्वल ठरलेल्या विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले आहे. यामध्ये लेख राजेश गोयनका (९६.००%), संकल्प संतोष तायडे (९४.००%), आर्या नितीन बऱ्हाटे (९३.५०%), युवराजसिंह सम्राटसिंग परमार (९३.५०%) आणि हंसीका जयकिशन जरानी (९१.५०%) यांचा समावेश आहे. या उज्ज्वल यशाबद्दल संस्थाध्यक्ष हितेश पाटील, उपाध्यक्ष मंगलाताई पाटील, संस्थापक सचिव एस. डी. पाटील तसेच क.म. विद्यालयाचे प्राचार्य दिलीपकुमार अढाव यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळेच हा उत्कृष्ट निकाल शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. विद्या विकास ज्युनिअर कॉलेजचा हा निकाल केवळ संस्थेसाठीच नव्हे तर संपूर्ण मलकापूर परिसरासाठी अभिमानाची बाब ठरत असून संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा अधोरेखित झाली आहे.