शेगाव : शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दररोज शाळेत ये-जा करणाऱ्या दोन अल्पवयीन बहिणींचा गेल्या ८ ते १० दिवसांपासून पाठलाग केल्याचा आणि त्यातील एका मुलीला रस्त्यात अडवून अश्लील शेरेबाजी करत त्रास दिल्याचा प्रकार शेगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून शेगाव ग्रामीण पोलिसांनी एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १४ वर्षीय मुलगी इयत्ता आठवीत शिकत असून तिची लहान बहीण इयत्ता सहावीत शिक्षण घेत आहे. दोघीही इलेक्ट्रिक दुचाकीने दररोज शेगाव येथे शाळेत ये-जा करतात. दरम्यान, एकफळ येथील राजकुमार परदेशी हा गेल्या ८ ते १० दिवसांपासून दोघींचा पाठलाग करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या दरम्यान पीडिता आपल्या आईसोबत गावातील भंडाऱ्याच्या कार्यक्रमासाठी जात असताना आरोपीने तिला रस्त्यात अडवले. यावेळी अश्लील शेरेबाजी करून तिला त्रास दिल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर पीडित मुलीने आपल्या कुटुंबीयांसह शेगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राजकुमार परदेशी, रा. एकफळ, ता. शेगाव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७५(१), ७८, ७९ तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) कलम १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शेगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.