मोताळा :- तालुक्यातील भोरटेक येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत लोखंडी कपाट फोडून सुमारे ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, हे दागिने एका महिलेने मुलीच्या लग्नासाठी कष्टाने साठवून ठेवले होते. २७ एप्रिलच्या रात्री ही घटना घडली असून २८ एप्रिल रोजी पहाटे साडेपाच वाजता प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. कांता उल्हास थोरगण (रा. भोरटेक) यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून कपाटाचे कुलूप तोडले. त्यानंतर कपाटात ठेवलेले सुमारे ३ तोळे सोन्याचे दागिने, ५ तोळे चांदीचे दागिने आणि १० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यात सोन्याची पोत, मंगळसूत्र, कानातले तसेच चांदीचे जोडवे व पायातील दागिन्यांचा समावेश आहे. घटनेच्या वेळी महिलेचे पती दवाखान्याच्या कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरफोडी केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, संबंधित महिलेने मोलमजुरी करून मुलीच्या लग्नासाठी हे दागिने तयार करून ठेवले होते. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाळ्यामुळे अनेक नागरिक रात्री गच्चीवर झोपत असल्याने घरांना कुलूप लावले जाते. अंधार आणि वीजपुरवठ्याच्या अडचणींचा फायदा घेत चोरटे सक्रिय होत असल्याचे चित्र आहे.
-या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. दिलीप तडवी करीत आहेत. तसेच, नागरिकांनी सतर्क राहून संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहन ठाणेदारांनी केले आहे.