भामट्यानी मंदिरही सोडले नाही! हनुमान मंदिरातून चांदीचे दागिने लंपास, आमसरी येथील घटना!

जलंब:- जलंब पोलीस ठाणे हद्दीतील आमसरी येथे सार्वजनिक हनुमान मंदिरातून मूर्तीवरील चांदीचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत ही चोरी घडली असून, एकूण ८२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमसरी येथील कमानीजवळ असलेल्या हनुमान मंदिरातील मूर्तीवर बसविण्यात आलेले चांदीचे दागिने अज्ञाताने चोरून नेले. यामध्ये डोक्यावरील चांदीचा मुकुट (₹४५,०००), तोंडाचा मुखवटा (₹३१,५००), डोळे (₹१,८००) तसेच लंगोटबंद छातीचा भाग (₹४,५००) असा एकूण ८२ हजार ८०० रुपयांचा ऐवज समाविष्ट आहे. ही घटना ३१ डिसेंबर २०२५ ते २८ मार्च २०२६ दरम्यान घडल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी पुरुषोत्तम मधुकर कुटे (रा. आमसरी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जलंब पोलीस ठाण्यात आरोपी मंगेश उर्फ शिवशंकर अभिमन्यू कुटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम ३३४(१) व ३०५ (A) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोहेका सचिन बावने हे ठाणेदार अमोल सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!