नापिकी आणि कर्जाच्या विवंचनेत अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

बुलढाणा : सततची नापिकी, डोक्यावर वाढत जाणारे कर्ज आणि आर्थिक अडचणींच्या विवंचनेत जामठी येथील ३९ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून जीवन संपविले. शरद नारायण तायडे यांनी २२ ऑगस्ट रोजी शेतात विषारी औषध प्राशन केले होते. उपचारादरम्यान २३ ऑगस्ट रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
जामठी येथील शरद नारायण तायडे यांच्याकडे तीन एकर शेती असून, त्यांनी ग्रामीण बँकेकडून कर्ज घेतले होते. २२ ऑगस्ट रोजी ते शेतातील गट क्रमांक १०२ मध्ये गेले असताना त्यांनी विषारी औषध प्राशन केले. ही बाब नातेवाईकांच्या निदर्शनास येताच त्यांना तातडीने बुलढाणा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच रविवार, २३ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सततची नापिकी आणि कर्जाचा वाढता भार यामुळे शरद तायडे मानसिक तणावात होते. याच विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यांच्या निधनाने तायडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि चार बहिणी असा आप्त परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!