२४ तासांत मोटारसायकल चोरीचा छडा; आरोपी गजाआड चिखली पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ४८ हजारांची दुचाकी ज

चिखली :- बसस्थानक परिसरातून चोरीस गेलेल्या मोटारसायकल प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा लावत चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाने आरोपीला अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून चोरीस गेलेली सुमारे ४८ हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साखरखेर्डा येथील सुभाष पांडुरंग सुसते यांनी त्यांच्या मालकीची हीरो एचएफ डिलक्स (एमएच २८ बीएम ३९१३) ही मोटारसायकल ४ जून रोजी चिखली बसस्थानकाजवळील देशी दारू गल्लीतील न्हाव्याच्या दुकानासमोर उभी केली होती. काही वेळानंतर परत आल्यावर मोटारसायकल जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल गवई व डी.बी. पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी मेहकर परिसरातील असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कोलारा फाटा येथे सापळा रचला. वाहन तपासणीदरम्यान विनाक्रमांकाची मोटारसायकल घेऊन येणाऱ्या संशयितास अडवून चौकशी करण्यात आली. वाहनाच्या इंजिन व चेसिस क्रमांकाची पडताळणी केली असता ते चोरीस गेलेले वाहन असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत आरोपीने आपले नाव वसीमखान बब्बुखान (वय ३५, रा. पैनगंगा नगर, मेहकर) असे सांगितले. विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने चिखली बसस्थानक परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीला अटक करून चोरीची मोटारसायकल जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे. या जलद कारवाईबद्दल चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!