Headlines

हुंड्याच्या मागणीने साखरपुडा मोडला; सहाजणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

खामगाव : विवाहासाठी हुंड्याची मागणी करून साखरपुडा मोडत मुलीच्या कुटुंबाची फसवणूक व विश्वासघात केल्याप्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळापूर फैल परिसरातील ४२ वर्षीय फिर्यादी यांच्या तक्रारीवरून कपिल सिद्धार्थ धांडे, सिद्धार्थ मनाजी धांडे, जिजाबाई सिद्धार्थ धांडे, कमला रमेश इंगळे (सर्व रा. बाळापूर, जि. अकोला), सुलक्षणा ऊर्फ सोनल विजय पानपाटील (रा. मोरझरी, ता. बाळापूर) आणि सुरेश वामन तायडे (रा. संभापूर, ता. खामगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीचा विवाह आरोपी कपिल धांडे याच्यासोबत ठरविण्यात आला होता. १ नोव्हेंबर २०२५ रोजी शेगाव रोडवरील द्वारकाधीश हॉटेल येथे साखरपुडा पार पडला. मात्र त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी आरोपींनी हुंड्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण करण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी विवाह मोडून फिर्यादींची फसवणूक व विश्वासघात केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(३), ३१६(२), ३(५) तसेच हुंडा प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल चव्हाण करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!