Headlines

परवानगीशिवाय शासकीय जागेवर शिवरायांचे पुतळे; देवधाबा व हरसोडा येथे अज्ञातांविरुद्ध गुन्हे; मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापूर : शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता शासकीय जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी देवधाबा व हरसोडा येथे अज्ञात व्यक्तींविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकरणांमध्ये शासकीय जागेवर अतिक्रमण करून अनधिकृतपणे पुतळे स्थापन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
देवधाबा येथील ग्रामपंचायत अधिकारी गजानन पंडित झनके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २९ जून रोजी रात्री ८ ते ३० जून रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान ग्रामपंचायतीच्या मालकीच्या बसस्थानकाजवळील मोकळ्या जागेत अज्ञातांनी सुमारे दोन फूट उंच लोखंडी कठड्यावर अंदाजे १३ फूट उंचीचा काळ्या रंगाचा फायबरचा अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. यासाठी कोणतीही शासकीय परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड करीत आहेत. दुसऱ्या घटनेत हरसोडा येथील ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद काशिराम माळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २५ जून रोजी दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान जुन्या मराठी प्राथमिक शाळेखालील शासकीय जागेत अज्ञात व्यक्तीने अंदाजे १३ फूट उंचीचा विटकरी रंगाचा फायबरचा अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृतपणे उभारला. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल राजेश बावणे करीत आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!