मलकापूर : तांदुळवाडी येथे बेकायदेशीरपणे देशी दारू बाळगणाऱ्या व्यक्तीविरुद्ध एमआयडीसी दसरखेड पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ४०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या १० बाटल्या जप्त करून संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जुलै रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास तांदुळवाडी येथे पोलिसांनी छापा टाकला. यावेळी गौतम मधुकर तायडे (वय ३१, रा. तांदुळवाडी, ता. मलकापूर) याच्याकडे ९० मिली मापाच्या देशी दारूच्या (संत्रा) १० बाटल्या आढळून आल्या. या दारूची एकूण किंमत ४०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त केलेल्या दारूपैकी एक बाटली सी.ए. सॅम्पल म्हणून स्वतंत्रपणे काढण्यात आली. आरोपीला गुन्ह्याबाबत नोटीस देऊन न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्याला जागेवरच सोडण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी अप. क्र. ९९/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल केला आहे.