जळगाव जामोद : शहरातील बालाजी मंदिर परिसरातील बालाजी ट्रेडिंग दुकानात चोरट्याने हात साफ केल्याची घटना समोर आली आहे. दुकानाच्या काउंटरवर ठेवलेली हिरव्या रंगाची पिशवी अज्ञात व्यक्तीने लंपास केली. या पिशवीत ९० हजार रुपयांची रोकड आणि चार बँकांची आठ चेकबुक होती. या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धान्य व्यापारी हरीदास माणिकराम माटे (वय ४५) यांनी ३० जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेच्या दरम्यान दुकानातील काउंटरच्या उजव्या कोपऱ्यात हिरव्या रंगाची पिशवी ठेवली होती. या पिशवीमध्ये ९० हजार रुपये रोख तसेच चार वेगवेगळ्या बँकांची आठ चेकबुक होती. दरम्यान, दुकानातील वर्दळीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने काउंटरवर ठेवलेली पिशवी चोरून नेली. काही वेळानंतर पिशवी गायब असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. याप्रकरणी हरीदास माटे यांच्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपमाला वानखडे करीत आहेत.