जळगाव जामोद : माहेरहून पैसे आणावेत, या मागणीसाठी विवाहित महिलेचा पतीसह नातेवाईकांकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याची तक्रार जळगाव जामोद पोलिसांत दाखल झाली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पटेल मोहल्ला, बहादूरपुरा, जिल्हा बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथे ही घटना घडली. तक्रारदार महिलेने पती तसेच त्याच्या नातेवाईकांकडून पैशांची मागणी करून वारंवार त्रास दिल्याचा आरोप केला आहे. तसेच इतर आरोपींनी मुख्य आरोपीला भडकावून महिलेला छळ करण्यास प्रवृत्त केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ८५, ३(५) अन्वये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय वेरूळकर करीत आहेत.