शेगाव : नांदेड रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणाचा छडा लावत शेगाव लोहमार्ग पोलिसांनी संशयित आरोपीला मलकापूर येथे ताब्यात घेत चोरीतील दागिने व रोख रक्कम जप्त केली. रेल्वे पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे आरोपीला अटक करण्यात यश आले असून प्रवाशांच्या सुरक्षेबाबतचा विश्वास अधिक बळकट झाला आहे. नांदेड रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ नुसार सोन्याचे दागिने चोरी झाल्याची नोंद करण्यात आली होती. तपासादरम्यान संशयित आरोपी आकाशदीप हा अमृतसर-नांदेड एक्सप्रेस (गाडी क्रमांक १२४३९) मधून प्रवास करत असल्याची गोपनीय माहिती रेल्वे पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे शेगाव लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ संबंधित रेल्वेगाडीत शोधमोहीम राबविली. संशयित इसम आढळून आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन रेल्वे पोलीस चौकी मलकापूर येथे आणण्यात आले. त्याची झडती घेतली असता चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये एक जोड पांढऱ्या धातूच्या चाव्याचे पेंडंट, दोन पिवळ्या धातूच्या लेडीज अंगठ्या, एक जोड पांढऱ्या धातूचे पायातील जोडवे, एक पिवळ्या धातूचे कानातले तसेच ४ हजार रुपये रोख रक्कम यांचा समावेश आहे. आरोपीसह जप्त केलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी नांदेड रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. ही कारवाई रेल्वे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव लोहमार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विवेकानंद राठोड यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार राम मोहेकर व पोलीस हवालदार खोडके यांनी पार पाडली. या यशस्वी कारवाईबद्दल संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.