देऊळगावमही येथे प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा

देऊळगावराजा :- अन्न व औषध प्रशासन विभागाने देऊळगावमही येथे धडक कारवाई करत प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय संजय भोपाळे (वय 25, अन्न व औषध प्रशासन, बुलढाणा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तौसीफ खान सलीम खान (रा. देऊळगावमही) व अन्य एका आरोपीविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 274/2026 दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 9.45 ते दुपारी 3 वाजेदरम्यान अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पंचांसमक्ष देऊळगावमही येथील एका इमारतीची झडती घेतली. झडतीदरम्यान मानवी आरोग्यास अपायकारक ठरणारा आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरणारा प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला.
या कारवाईत प्रीमियम नजर 1000 पानमसाला, एन-05 प्रीमियम च्युइंग तंबाखू, केसरयुक्त प्रीमियम नजर 9000 पानमसाला, विमल पानमसाला (किंग पॅक), व्ही-1 सुगंधित तंबाखू आणि राजनिवास सुगंधित पानमसाला असा एकूण 54 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान जप्त करण्यात आलेला माल दुसऱ्या आरोपीकडून आणण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपींविरुद्ध बीएनएस कलम 223, 274, 275, 123 व 3(5) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 मधील कलम 26(2)(ग), 26(2)(iv), 27(3)(D), 27(3)(T), 3(1)(zz)(iv) व 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या लेखी अहवालावरून पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय गोरे यांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड करीत आहेत.
दरम्यान, प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री व साठवणुकीविरोधात अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम सुरू असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!