साखरखेर्डा : मेहकर-चिखली मार्गावर अवैध वाळू वाहतुकीविरोधात साखरखेर्डा पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया करत तीन ट्रक आणि १४ ब्रास वाळू जप्त केली. या कारवाईत एकूण ४९ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. याप्रकरणी तीन चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, लव्हाळा फाट्यावरील कारवाईत दोन चालकांना अटक करण्यात आली आहे. रात्री दहाच्या सुमारास चिखलीकडून मेहकरच्या दिशेने जाणारा दहा चाकी हायवा (एमएच २८ सीएफ ८९५२) पोलिसांनी आँचल वाइन शॉपसमोर अडवला. चालक बळीराम प्रकाश मुंढे (रा. नारायणखेड, ता. देऊळगाव राजा) याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना नव्हता. तपासणीदरम्यान हायवामध्ये सहा ब्रास वाळू आढळली. हायवाची अंदाजित किंमत २५ लाख रुपये, तर वाळूची किंमत २४ हजार रुपये आहे. लक्ष्मण इनामे यांच्या फिर्यादीवरून मुंढे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी हिवरा आश्रम परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना लव्हाळा फाट्यावर दोन ट्रक आढळून आले. दोन्ही ट्रकमध्ये प्रत्येकी चार ब्रास वाळू होती. दोन ट्रक आणि वाळूसह २४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सौरभ दत्तात्रय म्हस्के (वय २३) आणि दीपक जनार्दन टाले (वय २४, दोघेही रा. खैरव, ता. सिंदखेड राजा) यांच्याविरुद्ध लक्ष्मण इनामे यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत दोन्ही चालकांना अटक करण्यात आली. रात्रीच्या कारवाईत ठाणेदार युवराज रबडे, लक्ष्मण इनामे, कडूबा डोईफोडे, योगेश जवंजाळ, राजेश गीते आणि वाहनचालक सुजित मेहेर सहभागी होते. तर लव्हाळा फाट्यावरील कारवाईत लक्ष्मण इनामे, कडूबा डोईफोडे, गजानन वाघ आणि राजेश गीते यांनी सहभाग घेतला. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास सहायक फौजदार कडूबा डोईफोडे करीत आहेत.