खामगाव : मेंढ्या चारण्यासाठी गेलेल्या शिराळा येथील मंगेश रतन ठोंबरे (वय २३) या तरुणाने काल २२ जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. हिवरखेड पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या शिराळा येथील मंगेश रतन ठोंबरे मालगिरी टेकड्याजवळ त्याच्या मावसभावासह राहत होता. मेंढीपालनासाठी २१ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास त्याने त्याच्या मेंढ्या चारण्यासाठी मालगीरी बाबा मंदिराचे मागे अकोली शिवारात नेल्या होत्या. दुपारी ४ वाजताच्या सुमारास त्याच्या मेंढ्या परत आल्या. परंतु, तो परत आला नाही. त्याचा मावसभाऊ नंदू मासाळ व नातेवाईकांनी
त्याचा शोध घेतला असता त्याने मालगीरी टेकड्यावर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्याचे काका कैलास हुरमा ठोंबरे यांनी हिवरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार कैलास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल चव्हाण व नाईक पोलीस कॉन्स्टेबल प्रविण जाधव करत आहेत.