Headlines

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी; ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक; जलंब पोलिसांची माटरगाव-भास्तन रोडवर कारवाई

जलंब : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखूची मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असल्याचे पुन्हा समोर आले आहे. लाखोंचा गुटखा दोन बोलेरो पिकअपमधून महाराष्ट्रात आणला जात असताना जलंब पोलिसांनी माटरगाव-भास्तन रोडवर नाकाबंदी करून दोन्ही वाहने पकडली. या कारवाईत गुटखा व पान मसाल्यासह दोन वाहनांचा असा एकूण ५५ लाख ५३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन्ही वाहनचालकांना अटक करण्यात आली आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती यांच्या पथकातील एपीआय निलेश देशमुख यांना मध्यप्रदेशातून प्रतिबंधित विमल गुटखा महाराष्ट्रात आणला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यांनी तत्काळ ही माहिती जलंब पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन पाटील यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी माटरगाव ते भास्तन रोडवरील महालक्ष्मी कृषी तंत्र महाविद्यालयाजवळ नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. या तपासणीदरम्यान दोन बोलेरो पिकअप वाहनांमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू व पान मसाला मोठ्या प्रमाणात आढळून आला. पोलिसांनी दोन्ही वाहनांमधील ३४ लाख ५३ हजार ३०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाला जप्त केला. तसेच २१ लाख रुपये किमतीची दोन बोलेरो पिकअप वाहने ताब्यात घेतल्याने एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ५५ लाख ५३ हजार ३०० रुपये झाली.
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे, बुलढाणा यांच्या फिर्यादीवरून विश्वजीत संजय गव्हांदे (वय २९, रा. शंकर नगर, खामगाव) आणि सुरेंद्र जानराव तायडे (वय ३६, रा. भीमनगर, जळगाव जामोद) यांच्याविरुद्ध जलंब पोलीस ठाण्यात अप. नं. ३७६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७४, २७५, १२३, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ च्या कलम ५९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईनंतर प्रतिबंधित गुटख्याच्या वाहतुकीवर पोलिसांनी अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला असला, तरी मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात होणारी गुटख्याची तस्करी आणि त्याचे वितरण रोखण्याचे आव्हान कायम आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दत्ता नरवाडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *