Headlines

एकाच वेळी दोन अल्पवयीन मुले बेपत्ता; शेगावात खळवाडी परिसरात खळबळ

शेगाव : खळवाडी परिसरातून १२ व १३ वर्षांची दोन अल्पवयीन मुले एकाच वेळी बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दोन्ही मुले २७ सप्टेंबर रोजी सकाळी घरातून एकत्र निघून गेल्यानंतर त्यांचा शोध घेऊनही ठावठिकाणा लागला नाही. याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन ज्ञानेश्वर वानखडे (वय १२) आणि मानव जितेंद्र मानकर (वय १३), दोघेही रा. खळवाडी परिसर, शेगाव, हे २७ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ७ वाजता घरातून एकत्र कुठेतरी निघून गेले. बराच वेळ उलटूनही दोघे घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी नातेवाईकांसह शेगाव परिसरात त्यांचा शोध घेतला. मात्र, दोन्ही मुलांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मुलांना फूस लावून पळवून नेले असावे, अशी शंका व्यक्त करत आर्यनचे वडील ज्ञानेश्वर जगदेव वानखडे (वय ३८) यांनी शेगाव शहर पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून २८ सप्टेंबर रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही मुलांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
आर्यन वानखडे हा गोऱ्या रंगाचा, सडपातळ बांध्याचा असून उंची सुमारे १४० सेंटीमीटर आहे. त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट व कथ्थ्या रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केली होती. त्याच्या उजव्या हातावर ‘आई-बाबा’ असे गोंदलेले आहे. मानव मानकर हा गोऱ्या रंगाचा, सडपातळ बांध्याचा असून त्याची उंची सुमारे १४५ सेंटीमीटर आहे. त्याने पिवळ्या रंगाचा टी-शर्ट व विटकरी रंगाची शाळेची पॅन्ट परिधान केली होती. त्याच्या डाव्या हाताच्या पंजावर स्टारचे गोंदण आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेंद्रसिंग चव्हाण करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!