खामगाव : राशन आणण्यासाठी काही वेळ घराबाहेर गेलेल्या महिलेचे घर चोरट्याने हेरले. दरवाजा उघडा असल्याची संधी साधून घरात प्रवेश करत लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ५८ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी चिंचपूर येथे उघडकीस आली. चिंचपूर येथील वैशाली देशमुख (वय ५५) या राशन आणण्यासाठी घराबाहेर गेल्या होत्या. यावेळी घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटातील सोन्याची गंठण, मणी मंगळसूत्र, कानातील टॉप्स तसेच १ हजार ६०० रुपये रोख असा मुद्देमाल चोरून नेला. वैशाली देशमुख घरी परतल्यानंतर घरातील ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. याप्रकरणी वैशाली देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोहेकॉ विलास साखरे करीत आहेत.