Headlines

शेतीच्या वादातून दोन गटांत हाणामारी; आठ जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे

खामगाव : तालुक्यातील लाखनवाडा येथील दोन गटांमध्ये शेतीच्या अतिक्रमणाच्या वादातून हाणामारी झाल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी घारोड शेतशिवारात घडली. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध पोलिसांत तक्रारी दिल्याने हिवरखेड पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
दिलीप महादेव मासाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ११ सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास शेतीच्या अतिक्रमणाच्या कारणावरून त्यांचा नातेवाइकांशी वाद झाला. यावेळी त्यांना अश्लील शिवीगाळ करण्यात आली. एका व्यक्तीने त्यांच्या काकाला मारहाण करून धक्का दिल्याने ते खाली पडले आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर अन्य दोन जणांनी दिलीप मासाळ यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी दुधीराम नातू मांकड, अंकुश नातू मांकड आणि भानुदास भोजाजी मरकड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, अंकुश नटू मांकड यांनीही पोलिसांत स्वतंत्र तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काही जण जेसीबी घेऊन घारोड शिवारात आले. मेंढ्यांचा वाडा खाली करून जागा मोकळी करण्यास सांगितल्याने वाद निर्माण झाला. यावेळी फिर्यादीचा भाऊ आणि आई तेथे आले. त्यानंतर झालेल्या वादात आरोपींनी काठीने हातावर तसेच डोक्यावर मारहाण केल्याने अंकुश मांकड जखमी होऊन बेशुद्ध पडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यांना उपचारासाठी खामगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या तक्रारीवरून नंदू चंदू मासाळ, सुनील मखन मासाळ, स्वप्नील दादाराव मासाळ, कौतिक महादेव मासाळ आणि मखन पावसू मासाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास हिवरखेड पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!