शेगाव : शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर शेगाव शहर पोलिसांनी गुरुवारी, १० सप्टेंबर रोजी धडक कारवाई केली. श्रीनिवास टॉवरमधील हॉलसह जुन्या बसस्थानक परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून तब्बल २९ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल केले. दोन्ही कारवायांमध्ये रोख रक्कम, मोबाईल आणि ताशपत्ते असा एकूण १ लाख ६१ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ७.३५ वाजता शहरातील श्रीनिवास टॉवर इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष या ठिकाणी धाड टाकली. कारवाईदरम्यान जुगार खेळणाऱ्या व्यक्तींकडून ५५ हजार ८० रुपये रोख, १६ स्मार्टफोन, एक जुना मोबाईल तसेच ताशपत्ते असा एकूण १ लाख ३६ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुनील राऊत यांच्या फिर्यादीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात कायमी अप क्रमांक ५७४/२०२६ नुसार महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात युनुस खान फतेह खान (वय ४६), उस्मान बेग मुघल बेग (वय ३९), शेख इकबाल शेख दिलदार (वय ४९), मोहम्मद जाफर मोहम्मद हनीब (वय ४४), राजेश सुदामराव भांड (वय ५६), मोहम्मद अस्लाम मोहम्मद मुसा (वय ४५), इमरान खान सलीम खान (वय २८), शेख अस्लाम अब्दुल सलाम (वय ३९), शंकर शालीगाम अळसालकर (वय ६०), संतोष देवराव चौधरी (वय ५०), मोहम्मद जमील मोहम्मद शरीफ (वय ४८), राहत खान सुजात खान (वय ४७), मोहम्मद सलमान मोहम्मद सलीम (वय ३०), शेख रईस शेख अनवर (वय ४०), सय्यद मुनीर सय्यद बिलाल, राजेश हिरालाल गंगावले (वय ५५), गणेश तुळशीराम गवळी (वय ५८), मोहम्मद शोएब मोहम्मद युसुफ (वय २०), शेख सईद शेख नथ्थू कुरेशी (वय ४१), शेख जावीद शेख इब्राहिम (वय ३८), शेख चाऊंद शेख गुलामनबी (वय ३५), अक्रम खान रहीम खान (वय ३५) आणि शेख रशीद शेख गणी (वय ४२) यांचा समावेश आहे.
दरम्यान, याच दिवशी सायंकाळी शहरातील जुन्या बसस्थानक परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावरही पोलिसांनी कारवाई केली. १० सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता मिळालेल्या माहितीच्या आधारे पंचांसमक्ष धाड टाकण्यात आली. यावेळी जुगार खेळणाऱ्या व्यक्तींकडून १९ हजार ३०० रुपये रोख, ५२ नग ताशपत्ते आणि दोन मोबाईल हँडसेट असा एकूण २५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी शेख इसाक शे. गफार (रा. खरवाडी परिसर, शेगाव), राजेश नारायण वैद्य (रा. सुरभी कॉलनी, शेगाव), विलास ओंकार तायडे (रा. हिंगणा, ता. बाळापूर), आकाश अमोल पांढरे, नंदू सखाराम सोळंके (रा. व्यंकटेश नगर ताडी परिसर, शेगाव) आणि शंकर गुलाबराव पटोकार (रा. धनगर फैल, शेगाव) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात एकाच दिवशी दोन ठिकाणी झालेल्या या कारवायांमुळे अवैध जुगार अड्डे चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे.