Headlines

मलकापूर शहर पोलिसांची विशेष मोहीम; नियम मोडणाऱ्यांकडून ३ लाखांवर दंड वसूल

मलकापूर : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवतानाच अवैध धंदे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मलकापूर शहर पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात धडक कारवाई केली. विविध गुन्ह्यांमध्ये आरोपींवर कारवाई करण्यासोबतच वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेत तब्बल ६२८ वाहनधारकांवर वाहतूक केसेस दाखल करून २ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा दंडात्मक महसूल वसूल करण्यात आला. विविध कारवायांमधून पोलिसांनी तीन लाख रुपयांपेक्षा अधिक दंडात्मक महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला.
मलकापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी शहर पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑगस्ट २०२६ मध्ये विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान जुगाराच्या प्रकरणांमध्ये कारवाई करत महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये सात प्रकरणे दाखल करून सात आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. या कारवाईत २ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच अन्य प्रकरणांमध्ये १५ केसेस नोंदवून १७ हजार ४९० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात तसेच नियमबाह्य पद्धतीने तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्धही पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत १३ केसेस दाखल करून ४ हजार ९८५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दरम्यान, शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि अपघातांना आळा घालण्याच्या उद्देशाने वाहतूक पोलिसांकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये दारूच्या नशेत बेजबाबदारपणे वाहन चालविणाऱ्या १२ वाहनचालकांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय ट्रिपल सीट, विना हेल्मेट, नो-पार्किंग तसेच आवश्यक कागदपत्रे नसलेल्या वाहनधारकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला. अशा एकूण ६२८ वाहनधारकांवर वाहतूक केसेस करून २ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दारूबंदी कायद्यांतर्गतही कारवाई करण्यात आली असून, शहर पोलिसांच्या या विशेष मोहिमेमुळे नियमभंग करणाऱ्यांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्यातील कारवाईचा हा धडाका आगामी काळातही कायम ठेवण्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!