शेगाव : फेसबुकवर झालेल्या ओळखीचे रूपांतर जवळकीत झाल्यानंतर एका ३६ वर्षीय स्टाफ नर्सला लग्नाचे आमिष दाखवून तसेच संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून रोहित गजानन पहुरकर (वय ३२, रा. आम्रपाली नगर, शेगाव) याच्याविरुद्ध शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिला अकोला येथे स्टाफ नर्स म्हणून कार्यरत असून फेसबुकच्या माध्यमातून त्यांची आरोपी रोहित पहुरकर याच्याशी ओळख झाली होती. आरोपीने आपल्या पत्नीला मूल होत नसल्याचे सांगून फिर्यादीची सहानुभूती मिळवली. त्यानंतर हळूहळू त्यांच्यात जवळीक वाढवत आरोपी अकोला येथील नागरी आरोग्य केंद्रात फिर्यादीला भेटण्यासाठी येऊ लागला. गोड बोलून विश्वास संपादन केल्यानंतर त्याने १३ सप्टेंबर २०२५ रोजी आपल्या आजोबांच्या आजारपणाचे कारण सांगत फिर्यादीला शेगाव येथे बोलावून घेतले. शेगाव येथे आल्यानंतर ‘कुठेतरी शांत ठिकाणी बसून बोलू’ असे सांगून आरोपीने फिर्यादीला खामगाव रोडवरील यश पॅलेस हॉटेलमध्ये नेले. तेथे महिलेचा विरोध असतानाही तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपीने या घटनेची माहिती कुणाला दिल्यास तसेच शेगावला येण्यास नकार दिल्यास आपल्यातील संबंधांची माहिती तिच्या पतीला सांगून संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीने नमूद केले आहे. या धमकीचा आधार घेत आरोपीने फिर्यादीवर दबाव कायम ठेवत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. अखेर या प्रकाराला कंटाळलेल्या महिलेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. सुरुवातीला अकोला येथील सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर प्रकरण शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शेगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण लिंगाडे यांनी १० सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि प्रवीण लिंगाडे करीत आहेत.