मलकापूर : एसटी बसची तपासणी सुरू असताना प्रवासी रिपोर्ट मागितल्याच्या कारणावरून वाहकाने मार्ग तपासणी पथकातील सहायक वाहतूक निरीक्षकास शिवीगाळ करीत धक्काबुक्की व मारहाण केल्याची घटना मेहकर बसस्थानकावर घडली. याप्रकरणी मेहकर पोलिसांनी रिसोड आगारातील संबंधित वाहकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मलकापूर येथील रहिवासी संजय डिगंबर नारखेडे हे रा.प. महामंडळाच्या बुलढाणा विभागात सहायक वाहतूक निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ८ सप्टेंबर रोजी ते बुलढाणा विभागाच्या मार्ग तपासणी पथकासह मेहकर बसस्थानकावर कर्तव्य बजावत होते. दुपारी सुमारे १.३० वाजता रिसोड आगाराची रिसोड-मेहकर बस क्रमांक एमएच ०७ सी ९४२८ बसस्थानकावर दाखल झाल्यानंतर पथकाने बसची तपासणी सुरू केली. तपासणीदरम्यान नारखेडे यांनी बसचे वाहक जगदीश बबन शेंडगे यांच्याकडे ई-टीआयएम मशीनमधील प्रवासी रिपोर्ट मागितला. मात्र, तक्रारीनुसार शेंडगे यांनी रिपोर्ट देण्यास नकार देत नारखेडे यांच्याशी शिवीगाळ केली. त्यानंतर वाद वाढत जाऊन शेंडगे यांनी नारखेडे यांना धक्काबुक्की व मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच, ‘तू नोकरी कशी करतो ते पाहतो,’ अशी धमकी दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे. घटनेवेळी मेहकर आगार व्यवस्थापक हर्षल साबळे, स्थानक प्रमुख अतुल सोनुने तसेच वाहतूक निरीक्षक राकेश चौधरी उपस्थित असल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, यापूर्वी संबंधित वाहकाविरुद्ध अहवाल सादर करण्यात आला होता. त्या अहवालाच्या आधारे निलंबनाची कारवाई झाल्याचा राग मनात धरून सदर प्रकार केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या प्रकरणी मेहकर पोलिसांनी वाहक जगदीश बबन शेंडगे यांच्याविरुद्ध एनसी क्र. ६०२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम ११५(२), २५२ व ३५१(३) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मेहकर पोलिस करीत आहेत.