Headlines

कर्जदारांकडून वसुली केली; कंपनीत भरणा न करता रक्कम लाटल्याचा आरोप; मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : कर्जदारांकडून नियमितपणे वसूल केलेल्या हप्त्यांची रक्कम कंपनीच्या खात्यात जमा न करता परस्पर हडप केल्याचा प्रकार मलकापूर शहरातील स्पंदना स्फुर्ती फायनान्शियल लिमिटेडच्या शाखेत उघडकीस आला आहे. ऑडिटदरम्यान झालेल्या तपासणीत तब्बल १ लाख १९ हजार २५० रुपयांचा अपहार समोर आल्यानंतर शाखा व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून कंपनीच्या सात कर्मचाऱ्यांविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बुलढाणा रोडवरील दीपक नगर परिसरात स्पंदना स्फुर्ती फायनान्शियल लिमिटेडचे शाखा कार्यालय आहे. या शाखेत १ जून २०२४ ते ६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत संबंधित कर्मचाऱ्यांकडून कर्जदारांकडून हप्त्यांची वसुली करण्यात आली. मात्र, वसूल झालेली रक्कम कंपनीकडे जमा करण्याऐवजी परस्पर स्वतःकडे ठेवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. कंपनीच्या ऑडिट मॅनेजरकडून शाखेतील आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात आल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. तपासणीमध्ये कर्जदारांकडून वसूल करण्यात आलेल्या रकमेत तफावत आढळून आली. त्यानंतर कंपनीच्या वतीने शाखा व्यवस्थापक पुनम हरचंद उमाळे (वय २७) यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी रवि शंकर सोनोने (रा. शिर्वा, ता. मोताळा), अक्षय संतोष तायडे (रा. हंबर्डी, ता. यावल), कृष्णा रामदास उफाड (रा. म्हसला बु., ता. बुलढाणा), प्रसाद राजू सोळंके (रा. व्यंकटेश नगर, शेगाव), एकनाथ बबन गव्हाड (रा. वाघोरा, ता. सिंदखेड राजा), कार्तिक देवानंद व्यवहारे (रा. कोल्हा, ता. अचलपूर) आणि आरिफ खान असिफ खान पठाण (रा. शेबा, ता. नांदुरा) या सात जणांविरुद्ध अप. नं. ६६२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील कलम ३१६(४), ३१८(४) आणि ३(५) अन्वये कारवाई केली असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार रविंद्र दळवी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!