Headlines

मलकापूर-बुलढाणा मार्गावरील अतिक्रमणावर जेसीबीचा हातोडा

मलकापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मलकापूर – बुलढाणा – चिखली राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग आला असून, मलकापूर शहरातील बुलढाणा रोडवरही बुधवारी, ९ सप्टेंबर रोजी अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा आणि महामार्गाचे बीओटी तत्वावर काम घेतलेल्या बुलढाणा अर्बनच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कारवाईत दाताळा ते मलकापूर बसस्थानकादरम्यान रस्त्यालगत उभारलेली अतिक्रमणे जेसीबीने हटविण्यात आली.
मा. सर्वोच्च न्यायालय तसेच जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ ए वरील बेकायदेशीर अतिक्रमणे हटविण्याची प्रक्रिया काही दिवसांपासून सुरू आहे. या कारवाईपूर्वी संबंधित अतिक्रमणधारकांना प्रसारमाध्यमांतून सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्यासाठी तीन वेळा नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतरही काही ठिकाणी अतिक्रमणे कायम राहिल्याने प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाईचा मार्ग स्वीकारला. महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेचे नियोजन यापूर्वी करण्यात आले होते. बुलढाणा येथील माऊली हॉटेलपासून येळगाव, जयस्तंभ चौक ते धाडनाका, येळगाव ते चिखली तसेच माऊली हॉटेल ते मोताळा आणि मोताळा ते मलकापूर भारतकाटा अशा विविध टप्प्यांत कारवाई करण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे नियोजनात बदल करण्यात आला आणि मागील तीन दिवसांपासून चिखली ते मलकापूरदरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. मलकापूर परिसरातील बुलढाणा रोडवरील अनेक अतिक्रमणधारकांनी कारवाईची चाहूल लागताच गेल्या दोन दिवसांपासून स्वतःहून अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे अशा ठिकाणी प्रशासनाच्या जेसीबी कारवाईत नुकसान टळले. मात्र नोटिसा देऊनही अतिक्रमणे कायम ठेवणाऱ्यांविरोधात बुधवारी थेट कारवाई करण्यात आली.
दाताळा ते मलकापूर बसस्थानकापर्यंत रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या मोठ्या अतिक्रमणांवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने जेसीबी चालवून ती हटविली. न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर कारवाई होत असल्याने कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न जुमानता अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. दरम्यान, तहसील चौक ते नांदुरा नाका परिसरातील अतिक्रमणे हटविण्याबाबतही सार्वजनिक बांधकाम विभाग मलकापूर आणि नगर परिषद प्रशासनाच्या स्तरावर हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. तसेच ११ सप्टेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगर परिषदेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोरील अतिक्रमण हटविण्याचा मुद्दाही चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेची व्याप्ती आगामी काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!