मलकापूर : शहरातील सई अपार्टमेंटसमोर उभी केलेली सुमारे ३० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना २५ ऑगस्टच्या रात्री घडली. याप्रकरणी तब्बल काही दिवसांनी ३ सप्टेंबर रोजी मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. मलकापूर येथील सई अपार्टमेंटचे रहिवासी प्रकाश मिनू पाटील (७०) यांनी त्यांची दुचाकी (क्र. एमएच-२८-एएच-२९५५) नेहमीप्रमाणे अपार्टमेंटसमोर उभी करून ते घरी गेले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता बाहेर आल्यानंतर दुचाकी जागेवरून गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात शोधाशोध करूनही दुचाकीचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रकाश पाटील यांनी मलकापूर शहर पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.