Headlines

धरणगाव ग्रामपंचायतीच्या विकासकामांचे तांत्रिक व आर्थिक ऑडिट करा! ३० दिवसांत कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा इशारा

मलकापूर : धरणगाव ग्रामपंचायत, ता. मलकापूर येथील मागील कालावधीत शासन तसेच ग्रामपंचायतीच्या विविध निधीतून करण्यात आलेल्या विकासकामांची सखोल व निष्पक्ष चौकशी करून तांत्रिक आणि आर्थिक ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी गटविकास अधिकारी, पंचायत समिती मलकापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धरणगाव ग्रामपंचायत अंतर्गत रस्ते, नाली बांधकाम, पेव्हर ब्लॉक, पाणीपुरवठा योजना तसेच विविध विकासकामे करण्यात आली असून, या कामांसाठी मंजूर झालेला निधी शासनाच्या नियमांनुसार व मंजूर अंदाजपत्रकानुसार खर्च झाला आहे का, प्रत्यक्षात मंजूर प्रमाणात कामे झाली आहेत का, कामांची गुणवत्ता योग्य आहे का तसेच मंजूर रक्कम व प्रत्यक्ष खर्चामध्ये काही तफावत आहे का, याची सखोल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान संबंधित कामांची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, ग्रामपंचायत ठराव, अंदाजपत्रक, कार्यादेश, निविदा अथवा कोटेशन प्रक्रिया, मोजमाप पुस्तिका, बिल-व्हाउचर, देयक नोंदी, योजना व निधीचे अभिलेख, काम पूर्णत्व प्रमाणपत्र व उपयोगिता प्रमाणपत्र आदी कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी, तसेच प्रत्येक कामाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कागदोपत्री नोंदी व प्रत्यक्ष कामाची तुलनात्मक पडताळणी करावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान आर्थिक अनियमितता, निधीचा अपव्यय, नियमबाह्य देयके, कागदपत्रांमध्ये अनियमितता, कामाच्या प्रमाणात तफावत अथवा अन्य गैरव्यवहार आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, ठेकेदार किंवा इतर जबाबदार व्यक्तींची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच शासकीय निधीचा गैरवापर झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांकडून रक्कम वसूल करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. अर्ज प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांच्या आत प्राथमिक चौकशी सुरू करून आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करावी, अन्यथा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपलब्ध लोकशाही व कायदेशीर मार्गांचा अवलंब करीत उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. चौकशी स्वतंत्र व सक्षम अधिकारी अथवा पथकामार्फत करून त्याचा सविस्तर तांत्रिक व आर्थिक ऑडिट अहवाल तयार करण्यात यावा आणि त्यामध्ये आढळलेल्या अनियमितता, जबाबदार व्यक्ती व करण्यात आलेल्या कारवाईचा स्पष्ट उल्लेख करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या अर्जाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा, जिल्हाधिकारी बुलढाणा, विस्तार अधिकारी (पंचायत), पंचायत समिती मलकापूर तसेच ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक, ग्रामपंचायत धरणगाव यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता प्रशासन धरणगाव ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी करून तांत्रिक व आर्थिक ऑडिट करण्याचे आदेश देते का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!