मलकापूर : चेहऱ्याला रूमाल बांधून स्वतःची ओळख लपवत रात्रीच्या अंधारात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका इसमाविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रेल्वे स्टेशनजवळील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड परिसरात करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास रविंद्र कालुसिंग भोसले (वय ५३, रा. लालगोटा हलखेडा, कुऱ्हा काकोडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) हा इसम रेल्वे स्टेशनजवळील कृउबासच्या मार्केट यार्ड परिसरात संशयास्पद स्थितीत आढळून आला. पंचांसमक्ष त्याची झडती घेतली असता त्याने चेहऱ्याला रूमाल बांधून स्वतःचे अस्तित्व लपविल्याचे निदर्शनास आले. सूर्यास्त ते सूर्योदय या कालावधीत एखादा दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने तो संशयास्पदरीत्या फिरत असल्याचा संशय पोलिसांना आला. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध अप. क्र. ६३९/२०२६ अन्वये महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.