मलकापूर : शहरातील वर्दळीच्या मलकापूर बसस्थानकासमोर मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालविणाऱ्या तीन तरुणांनी एका महिलेला मागून जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना सोमवार, २४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. धडकेत महिला रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाली. विशेष म्हणजे, जखमी महिलेला मदत करण्यासाठी धावून आलेल्या एका शिक्षकालाच मद्यधुंद तरुणांनी बेदम मारहाण केल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला दुचाकीने बसस्थानकाच्या दिशेने जात असताना मागून आलेल्या दुचाकीवरील तीन तरुणांनी तिच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात महिला खाली पडल्याने तिच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर महिलेला मदत करण्यासाठी एक शिक्षक घटनास्थळी धावून आले. मात्र, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तिन्ही तरुणांनी मदत करण्याऐवजी त्या शिक्षकासोबत वाद घालत त्यांना बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित तिन्ही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते. जखमी महिलेने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली होती. मात्र, हात व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला पुढील उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचीही प्राथमिक माहिती मिळत आहे. महिलेला धडक देऊन जखमी केल्यानंतर तिच्या मदतीला आलेल्या शिक्षकाला मारहाण केल्याने या प्रकाराबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या तरुणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.