मलकापूर : बसचे सीट पकडण्यासाठी धावत गेलेल्या एका वृद्धाचा पाय बसच्या मागील चाकाखाली आल्याने त्याच्या पायाचा चुराडा झाल्याची गंभीर घटना मलकापूर बसस्थानकात २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर जखमी वृद्धाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर बसस्थानकात बस क्रमांक एमएच 06 एस 8046 चा चालक बस रिव्हर्स घेत असताना एक वृद्ध व्यक्ती बसमध्ये जागा पकडण्यासाठी धावत गेले. यावेळी बसच्या हालचालीचा अंदाज न आल्याने त्यांचा पाय बसच्या मागील चाकाखाली आला. चाक अंगावरून गेल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत होऊन पायाचा चुराडा झाला. घटनेनंतर बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. उपस्थितांनी तातडीने जखमी वृद्धाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, या घटनेबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.