वाघुड : जलसंवर्धन दिनाचे औचित्य साधून वाघुड येथे १५० लाभार्थी शेतकऱ्यांना मोफत फळझाडांचे वाटप करण्यात आले. एवोनिथ स्टील पुरस्कृत दिलासा संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘तरंग’ प्रकल्पांतर्गत मलकापूर तालुक्यातील १० गावांतील फळबाग लागवडीस इच्छुक शेतकऱ्यांना फळझाडांचा लाभ देण्यात आला.
अनुराबाद, वाघुड, पान्हेरा, बहापुरा, हारसोडा, धोंगर्डी, घीर्णी, तांदुळवाडी, बेलाड आणि माकनेर या गावांतील निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना आंबा, लिंबू, पेरू, सीताफळ, नारळ, डाळिंब, बोर, आवळा आणि अंजीर या फळझाडांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला मागणी प्रमाणे २५ ते १०० फळझाडांपर्यंत लाभ देण्यात आला.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना भविष्यात अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होण्यास मदत होणार असून, त्याचबरोबर वृक्षलागवड, पर्यावरण संवर्धन आणि जलसंधारणाला चालना मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाघुड गावचे सरपंच सचिन तायडे होते. यावेळी माजी सरपंच उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नागरिक गोविंदा बोचरे आणि पांढरी किन्हेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच एवोनिथ स्टीलचे प्रफुल्ल भोपळे व कुणाल भातखेडे, दिलासा संस्थेचे नरेश बाजरे, वैभव नेमाडे, प्रियांका फिरके व अनिल घाटे यांच्यासह संस्थेचे कर्मचारी, ग्रामस्थ आणि लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शेतकरी व मान्यवरांना अल्पोहार देण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.