लोणार : शहरातील लोणी नाक्यावर भरदिवसा स्कॉर्पिओ वाहनाची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी साडेतीन लाख रुपयांची रोकड व महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग लंपास केल्याची धाडसी घटना गुरुवार, २० ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी लोणार पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.
जालना येथील रहिवासी तथा सध्या केशव शिवनी येथे मुक्कामी असलेले कांदा बी व्यापारी दिलीप माधवराव खरले हे कांदा बी खरेदीसाठी पांगरा डोळे येथे आले होते. त्यानंतर शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी नाक्याजवळील एका हॉटेलसमोर त्यांनी एमएच-२८ सीसी-५७५४ क्रमांकाची स्कॉर्पिओ उभी करून लॉक केली आणि चहा घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेले. हीच संधी साधत अज्ञात चोरट्याने वाहनाच्या चालकाच्या सीटमागील खिडकीवर दगड मारून काच फोडली. त्यानंतर वाहनात ठेवलेली साडेतीन लाख रुपयांची रोकड तसेच महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग घेऊन बाहेर दुचाकीवर थांबलेल्या साथीदारासह लोणी रोडच्या दिशेने पसार झाला. घटनेची माहिती मिळताच लोणार पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. तसेच चोरट्यांना पकडण्यासाठी परिसरात नाकाबंदी करण्यात आली. मात्र, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाले असून, त्यांच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दिलीप खरले यांच्या तक्रारीवरून लोणार पोलिसांनी अपराध क्रमांक ३४०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) व ३२४(२) अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनाली गर्जे करीत आहेत.