मासरूळ : येथील ४६ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १८ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, धाड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
धाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मासरूळ येथे विनोद गोपीनाथ कारंजकर हे पत्नी व मुलांसह राहत होते. त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १८ ऑगस्ट रोजी कुटुंबीयांच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी मृतकाचा भाऊ राजू गोपीनाथ कारंजकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार देशमाने व खमाटे करीत आहेत. विनोद कारंजकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई-वडील, एक भाऊ व बहीण असा आप्त परिवार आहे.