पिंपळगाव राजा :- मलकापूर येथे वृत्तसंकलनाचे कर्तव्य बजावत असलेल्या पत्रकारास कथित अरेरावी, दमदाटी व धमकी दिल्याच्या प्रकरणाचे पडसाद आता पिंपळगाव राजा येथेही उमटले आहेत. पत्रकारांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करणाऱ्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर निष्पक्ष चौकशी करून कायदेशीर तसेच विभागीय कारवाई करावी, अशी मागणी पिंपळगाव राजा ग्रामीण पत्रकार संघाने केली आहे. यासंदर्भात १६ ऑगस्ट रोजी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देण्यात आले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही या प्रकरणाची तक्रार पाठविण्यात आली आहे. मलकापूर येथे वृत्तसंकलन करत असताना पत्रकार दीपक इटनारे यांच्याशी पोलीस कर्मचारी चंद्रकांत कृष्णा शिंदे यांनी कथितरित्या अरेरावी व दमदाटी केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. पत्रकारांना त्यांचे कर्तव्य बजावताना अशा प्रकारे अडथळा आणणे अथवा धमकी देणे ही गंभीर बाब असून, या घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी भूमिका ग्रामीण पत्रकार संघाने मांडली आहे. या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी घटनास्थळावरील CCTV फुटेज, व्हिडिओ रेकॉर्डिंग तसेच इतर उपलब्ध पुरावे तातडीने सुरक्षित ठेवून त्यांची तपासणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. चौकशीत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची चूक किंवा दोष आढळून आल्यास त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई तसेच विभागीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही संघाने केली आहे. पत्रकारांना निर्भयपणे वृत्तसंकलन करता यावे आणि भविष्यात पत्रकारांच्या कर्तव्यात अडथळा आणण्याचे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव, विभागीय पोलीस अधिकारी अमरावती विभाग, पोलीस अधीक्षक बुलढाणा, उपविभागीय अधिकारी खामगाव तसेच जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. दरम्यान, पिंपळगाव राजा ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकारी व पत्रकारांसह एकूण १३ पत्रकारांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या करून या मागणीला समर्थन दिले आहे. पत्रकारांच्या कर्तव्यात अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करावी.