सुलतानपूर : श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त दर्शनासाठी सुलतानपूरकडे निघालेल्या भाविकांच्या ऑटो रिक्षाचा शुक्रवारी सुलतानपूर-भानापूर मार्गावर भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ऑटो रस्त्यालगतच्या विद्युत खांबावर आदळला. या दुर्घटनेत उदनापूर येथील भगवान शामराव मुळे (वय ७०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर ऑटोमधील अन्य प्रवासी गंभीर जखमी झाले.
प्राथमिक माहितीनुसार, श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे सुलतानपूर येथे आगमन झाल्याने पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी सुलतानपूरकडे येत होते. उदनापूर येथून भाविकांना घेऊन ऑटो रिक्षा सुलतानपूरच्या दिशेने जात असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. त्यानंतर भरधाव ऑटो रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबावर जाऊन जोरदार आदळला. अपघाताची तीव्रता एवढी होती की, भगवान मुळे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ऑटोमधील इतर काही प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींची नावे वृत्त लिहेपर्यंत समजू शकली नव्हती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ऑटोमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून तातडीने उपचारासाठी मेहकर येथे हलविले. जखमींपैकी गंभीर प्रकृती असलेल्या प्रवाशांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. या दुर्घटनेमुळे पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुलतानपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.