शेगाव : घरमालक दुपारच्या सुमारास बाहेर गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून दागिने, रोख रक्कम व मौल्यवान वस्तू असा सुमारे ५८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. शेगाव शहरातील पारीजात नगर परिसरातील एसबीआय कॉलनीत ३० जुलै रोजी ही घटना घडली. भरदिवसा झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रदीप रामदास परळीकर (५८), सेवानिवृत्त गटनिदेशक, रा. एसबीआय कॉलनी, पारीजात नगर यांनी याबाबत शेगाव शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, परळीकर दाम्पत्य ३० जुलै रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता मित्राच्या भेटीसाठी खामगाव येथे गेले होते. घराला तसेच कंपाउंडला कुलूप लावून ते बाहेर पडले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी घराच्या कंपाउंडमध्ये प्रवेश करून मुख्य दरवाजा तसेच ग्रिल गेटचे कुलूप तोडले. त्यानंतर घरातील लोखंडी कपाट व लॉकर फोडून त्यातील दागिने व रोख रक्कम चोरून नेली. चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये सुमारे ५० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, ३.५ ग्रॅम सोन्याचे कानातील टॉप्स, चांदीच्या तोरड्यांची जोडी, दोन चांदीचे करंडे, गणपतीची चांदीची मूर्ती, ६ हजार रुपये रोख आणि टायटन कंपनीची दोन मनगटी घड्याळे यांचा समावेश आहे. या सर्व मुद्देमालाची किंमत सुमारे ५८ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप बारिंगे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, रहिवासी परिसरात भरदिवसा घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.